जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ..
तुझा आजचा दिवस काही वेगळा नाही.काल जसा तुला चार लोकांमध्ये सावरावा लागलेला पदर आजही तसाच सावरायला लागेल. आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे आज काय तुझ्या दोन पायाच्या, उंच छातीच्या वरील नजरा हटतील अश्यातला भाग नाही. मी, त्याने, तुझ्या बाप, भावाने, काकाने, नवऱ्याने हेच केलंय बघ. रोज करतो. तिथे नाते नसतात. तिथे वासना असते नजरेतील. घरातील आणि घराबाहेरील पुरुष लय वेगळा असतो. तुला सांगेन आतून नीट कडी लावून घेशील घराबाहेर पडताना. कारण त्याला माहितीय बाहेर गेल्यावर मी स्वतः किती धोकादायक असतो. चार पुरुषांमधील आम्ही आणि चार स्त्री-पुरुषांमधील आम्ही भयंकर वेगळे असतो. तुझ्या पाठ फिरलेल्या देहाकडे बघणाऱ्या नजरा भयंकर वेगळ्या असतात. हे पुरुष असल्याने आज सांगू शकतोय. कदाचित तुला या सर्वांची उबग येण्याचेही बंद झाले असेल. तुझा अस्तित्वाचा दिवस येत नाही. तो तुला स्वतःला आणावा लागतो. विनंती करून नाही तर, बंड करून. रोज स्त्री अंगाच्या शिव्यांनी भरलेल्या तोंडात तितकाच सहज स्त्री दिवसाचा पण उल्लेख होईल बघ आज. पण, मी ठरवलंय. नको त्या तुझ्या अंगावरून तयार झालेल्या शिव्या आज पासून. त्या शिवाय कसला अर्थ ना...