आणि त्याचा 'बुद्ध' झाला
बुद्धाला एनलाईटनमेंट मिळाली म्हणजे नक्की काय झाले असेल? एका क्षणात अशी काय उलथापालथ झाली असेल? एकेकाळी झपाटल्यासारखं यावर बरंच काही वाचून काढलं होतं पण उत्तर मिळालं नाही. त्याची सहज सुंदर व्याख्या माझ्या आईने दिली होती. तिच्या म्हणण्यानुसार एका विशिष्टक्षणी गौतमच्या मनात अत्युच्च अनुकंपा निर्माण झाली, त्याच्या आत्म्यातला आपपरभाव लोपला, प्रत्येक जीवजंतू, प्राणिमात्र, सृष्टी यापासून मी वेगळा नाही हा भाव त्याच्या मनात उत्पन्न झाला आणि त्याचा 'बुद्ध' झाला आणि तो एक क्षण नव्हता, तर एक प्रदीर्घ प्रवास होता. मानवी आयुष्यातल्या दैन्य, दुःखाने पराकोटीने व्यथित झालेल्या एका आत्म्याचा प्रवास. आईने एक साधासरळ विचार मांडला होता. तिला हा विचार मांडताना कोणावर काहीही ठसवायचे नव्हते. तिने या विषयावर इतका खोलवर विचार केला असेल असे मला कधीही वाटले नव्हते. त्यातून मला बरंच काही उमजल्यासारखं वाटलं. गौतमच्या मनात विशुद्ध 'प्रेमभाव' जागृत झाला. हे माझं, ते परकं असं काही उरलंच नाही. त्याक्षणी त्याच्यातला 'मी' त्याला संपूर्ण सृष्टीत प्रतिबिंबित झालेला दिसला. बुद्ध आणि त्याचा प्रवास ...