आणि त्याचा 'बुद्ध' झाला

बुद्धाला एनलाईटनमेंट मिळाली म्हणजे नक्की काय झाले असेल? एका क्षणात अशी काय उलथापालथ झाली असेल?

एकेकाळी झपाटल्यासारखं यावर बरंच काही वाचून काढलं होतं पण उत्तर मिळालं नाही. त्याची सहज सुंदर व्याख्या माझ्या आईने दिली होती.

तिच्या म्हणण्यानुसार एका विशिष्टक्षणी गौतमच्या मनात अत्युच्च अनुकंपा निर्माण झाली, त्याच्या आत्म्यातला आपपरभाव लोपला, प्रत्येक जीवजंतू, प्राणिमात्र, सृष्टी यापासून मी वेगळा नाही हा भाव त्याच्या मनात उत्पन्न झाला आणि त्याचा 'बुद्ध' झाला आणि तो एक क्षण नव्हता, तर एक प्रदीर्घ प्रवास होता. मानवी आयुष्यातल्या दैन्य, दुःखाने पराकोटीने व्यथित झालेल्या एका आत्म्याचा प्रवास.

आईने एक साधासरळ विचार मांडला होता. तिला हा विचार मांडताना कोणावर काहीही ठसवायचे नव्हते. तिने या विषयावर इतका खोलवर विचार केला असेल असे मला कधीही वाटले नव्हते.

त्यातून मला बरंच काही उमजल्यासारखं वाटलं. 

गौतमच्या मनात विशुद्ध 'प्रेमभाव' जागृत झाला. हे माझं, ते परकं असं काही उरलंच नाही.  त्याक्षणी त्याच्यातला 'मी' त्याला संपूर्ण सृष्टीत प्रतिबिंबित झालेला दिसला. 

बुद्ध आणि त्याचा प्रवास याबाबत विचार करताना मी अनेकदा व्यावहारिक जगाच्या फुटपट्ट्या लावून पाहिल्या. पत्नीला सोडून गृहत्याग केलेली एक सामान्य व्यक्ती असाही विचार करून पाहिला. कौटुंबिक समीकरणे लावून पाहिली. त्याकाळची परिस्थिती, समाजरचना याबाबत मी जास्त खोलात गेले नाही. माझ्या तोकड्या बुद्धिनुसार एकेकाळी बुद्धाची गणना बायको आणि घरदार सोडून गेलेला अतिसामान्य माणूस अशीच केली.

कालांतराने वाटायला लागलं त्याने पत्नीचा लौकिक अर्थाने त्याग केला नसता, तो त्या महालातच एक सुखी कौटुंबिक नाट्य रंगवत राहिला असता तर परिस्थिती नक्की कशी असती?

मानवी आयुष्यातल्या पराकोटीच्या दुःखाची जाणीव झाल्यानंतरची अस्वस्थता त्याच्या आयुष्यातल्या एकातरी नात्याला न्याय देऊ शकली असती का? तो जेव्हा स्वतःच इतका व्यथित होता तर त्याच्या आयुष्यात असणाऱ्या इतरांना तो काही न्याय देऊ शकला असता का? त्या परिस्थितीत तो आयुष्यात असूनही त्याच्या आजुबाजूच्या व्यक्तींना त्याच्या सहवासाचा आनंद लौकिकार्थाने लाभला असता का?  उत्तर नेहमीच 'नाही' असं येतं.

वेदनेने गोठलेल्या जाणिवांचं बधिरपण युगानेयुगे वागवल्यावर कदाचित त्याची स्थळ, काळ, वेळ याची सर्वच गणिते बदलून 'प्रेम' आणि 'अनुकंपा' या दोनच शाश्वत जाणिवा चराचरात उरल्या असाव्यात!
Disha g

Comments

Popular posts from this blog

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे...

मराठी का गरजेची?

लोकशाही आणि संसद