मराठी का गरजेची?
माझ्या घरात एक छोटंसं झाड आहे. रोज त्याला पाणी घालतो, त्याच्यावर प्रेम करतो. एक दिवस विसरलो… आणि दोनच दिवसांत त्याच्या कोवळ्या फांद्या वाकायला लागल्या. तेव्हा जाणवलं – कुठलीही गोष्ट टिकवायची असेल, तर तिला प्रेम, काळजी आणि सातत्य हवं.
मराठी भाषा सुद्धा असंच एक झाड आहे. ती आपली मुळं आहेत. जर आपणच तिला पाणी घालणं थांबवलं, तिला वापरणं कमी केलं, तिला मागे टाकलं… तर ती हळूहळू सुकून जाईल. आणि एक दिवस आपणच आपली ओळख हरवून बसू.
आज महाराष्ट्रात वारंवार एक प्रश्न ऐकू येतो – “मराठी भाषा का गरजेची आहे?”
काहींना वाटतं, मराठी फक्त शाळा, गाव आणि घरापुरती मर्यादित असावी. पण ही भाषा फक्त बोलण्याचं साधन नाही – ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे.
लहानपणी आपण सगळ्यांनी आजीच्या कुशीत झोपताना तिच्या गोष्टी ऐकल्या आहेत – त्या सगळ्या मराठीतूनच.
ती गोष्टी सांगताना चेहऱ्यावरच्या हावभावातून संस्कार करत होती. “एक होता राजा...” म्हणणारी आजी जेव्हा एखाद्या गोष्टीला “उपकार विसरू नयेत” म्हणायची, तेव्हा फक्त शब्द नव्हते ते – ती आपल्याला आपली माती शिकवत होती, आपलं माणूसपण शिकवत होती.
आजकाल मुलं इंग्रजीमध्ये बोलताना माज करतात, पण मराठी बोलायला कमीपणाची भावना बाळगतात.
मराठी येत नाही, लिहिता येत नाही, वाचता येत नाही – हे जेव्हा अभिमानाने सांगितलं जातं, तेव्हा ते फक्त भाषेचा नव्हे, तर आपल्या ओळखीचा अपमान आहे.
मराठी आणि इंग्रजी – स्पर्धा नाही, समांतर वाटचाल
लोक म्हणतात – “नेत्यांची मुलं इंग्रजी शाळांमध्ये जातात. मग मराठीचा आग्रह कशाला?”
तर उत्तर स्पष्ट आहे – हो, इंग्रजी शिका, नवी तंत्रज्ञानं शिका, जगाशी जोडून घ्या. पण त्या बदल्यात मराठी विसरू नका.
जगाला भिडायचं असेल, तर इंग्रजी लागेलच. पण आपल्या मनाशी जोडून राहायचं असेल, तर मराठी हवीच.
एक पाय जमिनीवर आणि एक पाऊल आकाशात – हीच खरी वाटचाल.
आपल्याला जागतिक होणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वत्व टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
भांडण नव्हे, पण स्वाभिमान जरूर
हल्ली काही घटना अशा घडतात जिथे भाषा आणि अस्मितेच्या नावाखाली वाद आणि हिंसा होते.
ही हिंसा चुकीची आहे. भाषेसाठी लढा देणं म्हणजे कुणाला त्रास देणं नव्हे.
पण जिथे कुणी आपल्या घरात येऊन आपल्यालाच उपेक्षित करतो, आपली भाषा मागे टाकतो, आणि आपल्याच संस्कृतीत राहून “मला हे शिकायचंच नाही” असं म्हणतो – तिथं विरोध व्हायलाच हवा.
तो विरोध शांत असू शकतो, पण ठाम हवा.
अनेक गैरमराठी माणसं इथे प्रेमानं, सौजन्यानं, समजुतीनं राहतात. कारण ते इथल्या संस्कृतीचा आदर करतात.
संघर्ष तिथेच होतो, जिथे अरेरावी, दर्प आणि “हे माझं नाही” अशी वृत्ती असते.
भाषा म्हणजे आपली मुळं
आज आपण आपल्या मुलांना मोबाईल, इंटरनेट, इंग्रजी शिकवतो – ते योग्य आहे.
पण त्याचबरोबर त्यांना “आई गं”, “विठू माऊली”, “अळूचं फदफदं भाजी” हे शब्द, ही गोडीही शिकवली पाहिजे.
भाषा जपणं म्हणजे शब्द जपणं नव्हे – ते भाव जपणं आहे, संस्कृती जपणं आहे.
आपल्या भाषेत आपल्या घराचं उब आहे. आपलं गाव, आपली वाडी, आपलं बाजारपेठ, शाळा, पोशिंदा – सगळं मराठीतूनच उलगडतं.
शेवटचं मनापासून
एक दिवस येईल, जेव्हा आपल्या पुढच्या पिढ्या विचारतील –
“बाबा, आजी काय बोलायची? तुझं आणि तिचं काही वेगळंच होतं का?”
आणि जर त्यावेळी आपल्याकडे सांगायला काही नसेल, तर त्या शांततेपेक्षा मोठं दुःख दुसरं काही नसेल.
म्हणूनच –
हो, आम्ही इंग्रजी शीकतो. जागतिक बनतो. पण आम्ही आमची मराठी भाषा सोडणार नाही. ती आमची माती आहे. आमचं मन आहे. आमची ओळख आहे.
आणि म्हणून गर्वाने म्हणू –
"अभिमान आहे मला, मी मराठी आहे!"

Comments
Post a Comment