कमजोर नातं?

आज इतक्या वर्षांनी आठवण तरी आली. अननोन नंबर वरून फोन आला खरा,पण पलीकडचा आवाज चांगलाचं ओळखीचा होता. हा आवाज कसा विसरेन मी. या मधाळ आवाजतलं कडवेपणही तितकंच चाकुन झालेलं. थोड्यावेळ विश्वास नाही बसला.बसणार तरी कसा, परकं झालेलं आपलं माणूस फोनवर होतं. कसं असतं ना, माणूस कितीही त्रास देऊन गेलं तरी पुन्हा आवाज ऐकल्यानंतर ओढ लागतेच...
सहा वर्षे झाली आता. घरी आईवडिलांना कळालं आणि नातं तुटलेलं आमचं. इच्छा नसताना आयुष्यात वेगवेगळं पुढे जाण्याचा तिने घेतलेला निर्णय. पहिल्यापासूनच खमकी होती. भावना बाजूला सारून प्रक्टिकल निर्णय पटकन घ्यायची. आईवडिलांच्या प्रेमाखातर मला दूर करण्याचा निर्णयही तिचाचं. बुद्धीने तल्लख, दिसायला देखणी, फडफड इंग्लिश बोलणारी. माझ्यात उगाच घुटमळली. ते एक वर्ष वाया गेलं नसतंं तर कदाचीत अजून चांगल्या कॉलेजला नंबर लागला असता तिचा. अल्लड वय,मोह, आकर्षण...पडलो प्रेमात.
म्हणाली, “तुझी आठवण येतीये. गेले कित्येक दिवस सतत तुझं असणं जाणवतं.काहीही न सांगता मी निघून आले. मान्य आहे मला, चूक झाली माझी. त्याची शिक्षाही मिळाली. फोन नंबर बदलला, तुझा नंबर ब्लाँक लिस्टमध्ये टाकला. वाटलं, नकोच ते पुन्हा.
तुला वाटत असेन, की ही विसरली. पण नाही रे, नाही विसरू शकले. सतत तू माझ्यासोबत असायचास. कित्येकदा इच्छा व्हायची. वीट यायचा सगळ्या गोष्टींचा. तेच फाँर्मूले, त्याचं थेरम्स. आयुष्याचं गणित विस्कटून पुस्तकातलं गणित सोडवत बसलेले मी...
पुन्हा प्रेमात देखील पडले. माझ्याच वर्गातला. खूप काळजी घेतो. त्याला आपल्याबद्दल सांगितलं. मूव्ह आँन म्हणाला. बस इतकंच... आपल्यात काय घडलं,नातं किती घट्ट होतंं याबद्दल त्याने काहीही विचारलं नाही. घरून येताना दुपारी माझ्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येतो. काही हवं नको बघतो. अभ्यासाच्या नोट्स काढून देतो. अरे लग्नासाठी विचारलं त्याने मला. अंगठीच घेऊन आला डायरेकट. तुला गमवायचं नाहीये म्हणतो. समजत नाहीये हो म्हणू की नको. घालमेल होतीये रे...
वाशरूम मध्ये पाणी अंगावर घेतल्यानंतर नाव तुझं येत तोंडात. कोणी आवाज दिला की वाटतं तूच आलास. शेपूची भाजी डब्यात दिसली की तूझं वाकडं केलेलं तोंड आठवतं. त्याला किस करताना डोळे बंद केले की तुझा चेहरा समोर येतो. सेक्स देखील झालं आमच्यात. अर्थात आता तुझ्यापासून काय लपवायचं.
खूप वाईट आहे मी. तुला अर्ध्यावर सोडून दिलं आणि आता जो हात देतोय त्याच्याशी देखील एकनिष्ठ नाहीये. मुद्दामून नाहीये रे करत हे सगळं. तो आवडतो मला. प्रेम देखील करते पण पुन्हा पुन्हा तुझाच चेहरा डोळ्यासमोर येतो...”
फोनवर रडली ती. माझं प्रेम इतकं कमजोर नव्हतं जाणवलं मला. कुठेतरी तिला घट्ट बांधून ठेवलेलं स्वतःशी. नातं तोडलं तीनं पण ओलावा नाही घालवू शकली. आता तिला जास्त अडकवायचं नव्हतं स्वतःत. मोकळं करायला हवं. उगाच घुटमळतोय तिचा जीव. पुढे गेलीये आयुष्यात. आता मागे नाही ओढायचं. ती अशीच पुढे जायला हवी. माझी आठवण छळतेय तिला. मला सोडून गेल्याचं दुखः होतंय. मनाला लागलंय. टोचतंय सारखं. स्वतःला वाईट समजतीये ती. आतल्या आत कुडत चाललीये. मलाचं कठोर व्हावं लागेल. तिच्या मनातलं गिल्ट संपवायला हवं...
“इथून पुढे फोन करायचा नाही म्हणलं. माझ्या आयुष्यात एक मुलगी आहे. खूप प्रेम करतो तिच्यावर. तुझे हे इमोशनल चाळे बंद कर. तेव्हा गेलीस ना सोडून. काही फरक नाही पडला. जा आता जो मिळाला आहे ना त्याच्याकडे बघ. तुझ्यासारख्या मुलींची गरज नाही मला.”
फोन कट केला मी... तिला आयुष्याचं कनेक्शन सापडावं म्हणून.
nir

Comments

Popular posts from this blog

मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे...

मराठी का गरजेची?

लोकशाही आणि संसद